मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी करवीरनिवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते कोल्हापुरात आले होते. राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर अंबाबाईच्या दर्शनासाठी येऊ, असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. सकाळी दहाच्या सुमारास ते मंदिरात पोहोचले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकाआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, आदी उपस्थित होते. माजी आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना चांदीची तलवार, तर माजी खासदार निवेदिता माने यांनी चांदीचा धनुष्यबाण भेट दिला. यानंतर उजळाईवाडी येथील विमानतळावरून मुख्यमंत्री पुण्याकडे निघाले. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, आदी उपस्थित होते.